मा. राष्ट्रपती आणि सफ़रचंद

नोव्हेंबर 24, 2009

काल सकाळची गोष्ट. आमचा पेपरवाला प्रसन्न झाल्यामुळे “सकाळ” अगदी सकाळी सकाळी येउन पडला होता. आणि रात्री उशीरा झोपल्यामुळे, माझी दोन वर्षाची मुलगी पण अजुन उठलेली न्हवती. फ़ारा दिवसाने योग आल्यामुळे नीवांत सकाळ पहायला मिळाला. त्यातच एका बातमीने लक्ष वेधुन घेतलं.

भारताच्या मा. राष्ट्रपती यांची भारतीय विमान दलातील अद्ययावत “सुखोई” विमान प्रवासासाठी जय्यत तयारी.

लागलीच मी ही बातमी “ही”ला वाचुन दाखवली.

“म्हणजे राष्ट्रपती स्वतः विमान चालवणार आहेत का?” ….आमची ही.

“नाही. नाही. बसणार आहेत. ह्या विमानाचा वेग ताशी ९०० किमी इतका जाऊ शकतो. अशा विमानात वयाची ७५री पार केलेल्या राष्ट्रपती प्रवास करणार आहेत.” ..मी

“कशासाठी?”…… ही.

’सॅनिकांचे मनोधॅर्य वाढवण्यासाठी’, असं उत्तर देण्याच्या विचारात होतो, पण परत आणखी प्रश्न निर्माण होण्याच्या भितीने मी ह्या प्रश्नाला “वेल लेफ़्ट” केले. 😉

“पुण्यातुन उड्डाण होणार आहे.”…. मी.

“हो का.. कुठे जाणार आहेत?”… ही.

“हं! बहुतेक पुण्यातुन पुण्यात परत. पुण्यात सुखोई चा तळ आहे.” … दाढी करण्याच्या निमित्ताने पुढील चर्चा मीच आवरती घेतली.

—————————————————————————–

आहो पण राष्ट्रपती आणि सफ़रचंदाचा काय संबंध?

सांगतो सांगतो.. सगळं सांगतो.

आज ऑफ़िस मधुन निघताना फ़ोन केला तर, जर चांगली मिळाली तर येताना सफ़रचंद घेऊन ये…. ही

साधारण कितीला असतात…. मी – श्रीमंती फ़ळं विकत घेण्याची सवय नाही. पण सध्ध्या घरात कन्या, आई आणि बाबा असे तीन पेशंट असल्यामुळे, लेट तर लेट – An Apple a Day – Keeps Doctor Away साठी सफ़रचंद घेण्यचे धाडस करण्याचे मी ठरवले.

औंधहुन कोथरुडला येताना, पाषाण रस्त्यावर, NCL कॉलिनी तुन बाहेर आल्याआल्या रस्त्याच्या डाव्या बाजुला एक मोठा फ़ळांचा स्टॉल आहे. एकदा-दोनदा केळी आणि स्वस्तं झाल्यावर सिताफ़ळं घेतली असतील, पण मराठीतुन गप्पा मारल्यामुळे चांगली ओळख झाली आहे. आज पाहिलं तर स्टॉलचा मिनी-स्टॉल झाला होता. दोनचारंच प्रकाराची फ़ळं, ती ही अगदी थोडीथोडी.

काय हो. आज लवकर बंद काय? आणि माल काहिच नाही. मार्केट ला जायला विसरलात की काय? – मी

नाही. राष्ट्रपती येणार आहेत ना. – श्री. फ़ळवाले

मग? बाजारतली सगळी फ़ळं तिकडे गेली? — मी.

नाही. पोलिसांनी सांगितल की ३ दिवस दुकान बंद ठेवा. – श्री. फ़ळवाले

का ? – मी.

राष्ट्रपती येणार आहेत ना पुण्याला. विमानात बसायला. – श्री. फ़ळवाले

—————————————————————————–

कोण म्हणतो, सरकार आणि सामान्य जनता यात संबंध उरला नाही?

राष्ट्रपतींच्या पुण्यनगरी आगमनाने, कित्त्येक सामान्य नागरिकांच्या सामान्य दिनमानावर फ़रक पडतो तो असा.

केवळ जगण्यावरच न्हवे…..

मा. पंतप्रधानांच्या भेटीसाठी कडक झालेल्या सु्रक्षाव्यवस्थे्मुळे वेळीच इस्पितळात प्रवेश करु न शकल्यामुळे एका अत्याव्यस्थ रुग्णाला आपले प्राण देखील गमवावे लागले ही बातमी आपल्या लक्षात असेलचं.

आम्ही मात्र खुश आहोत. कदाचित मा.  राष्ट्रपतींच्या भेटीमुळे,  आमच्या नेहमीच्या रस्त्यावरचे खड्डे बुजण्याची शक्यता आहे.

मी , स्वाइन फ्लू..

ऑगस्ट 20, 2009

From a forwarded mail.

नमस्कार मी स्वाइन फ्लू.

तुम्ही मला नावानं ओळखत आहातच. पण माझी कधी भेट होऊ नये असंच प्रत्येकाला मनातून वाटत आहे. कॉलरा पटकी प्लेग ,देवी आणि अलीकडे डेंगी अशा विविध अवतारांत मी पृथ्वीतलावर अवतरलो होतो. भारतात मी अवतरलो तो थेट पुण्यातच. मी पुण्यातच का अवतरलो या बद्दल पुण्यातल्या लोकांत मोठे कुतूहल आणि संतापही आहे. ‘ याला दुसरं गाव दिसलं नाही का ’ असा प्रचंड संतापयुक्त प्रश्न मला पुण्यात पावला पावलावर क्षणोक्षणी ऐकायला मिळतो आहे. मी पुणं का निवडलं कारण पुण्यात जी गोष्ट स्वीकारली जाते ती उभ्या महाराष्ट्रात स्वीकारली जाते असं पुणेकर अभिमानाने सांगत असतात. कृपया आहेर आणू नयेत ’ ची चळवळ पुण्यातच चालू झाली. आता ती सगळीकडे पसरत आहे. पुणेकरांना आपलंसं केलं तर महाराष्ट्रात पाय पसरायला वेळ लागणार नाही असा धूर्त विचार मी केला.

पुण्यात अवतरण्याने माझी जशी दखल घेतली जाईल तशी दखल मी अन्य ठिकाणी अवतरलो असतो तर घेतली गेली नसती हेही मला ठाऊक झाले होते. वर्षा-दोन वर्षापूर्वी सोलापूर सांगली मराठवाडय़ात आमच्या भावकीतला चिकनगुनिया अवतरला होता. त्याने त्यावेळी अनेक विकेटही घेतल्याहोत्या. पण ना पेपरवाल्यांनी त्याची म्हणावी तशी दखल घेतली ना चॅनेलवाल्यांनी. स्थानिक छोटय़ा पेपरांत दोन-चार दिवस बातम्या छापून आल्या. बस्स. पुण्यातअवतरल्यामुळं मला अशी प्रसिद्धी मिळते आहे की विचारू नका. दररोजच्या पेपरची पान एकची जागा माझ्या नावानं बुक आहे. चॅनेलवाल्यांना तर कोलीतच मिळालंय.पुण्यात??्या पेपरवाल्यांनी उठवलेला जबरदस्त आवाज बघून केंद्रीय आरोग्यमंत्र्याला संसदेत निवेदन करावं लागलं. अशी प्रसिद्धी मी बीड नांदेडमध्ये अवतरलो असतो तर कधीच मिळाली नसती. याचं कारण पुणेकरांचं सगळं वेगळंच आहे.

पुण्यापासून ३०-४० किलोमीटरवरच्या सासवडजवळ हंडाभर पाणी मिळवण्यासाठी लोकांनादोन-दोन मैल पायपीट करावी लागते. पण त्याची चार ओळीची बातमी कधी छापून येत नाही. पण परवा पुण्यात एक वेळ पाणी येणार म्हटल्यावर असा काही कालवाझाला की खुद्द वरुणदेवही घाबरला आणि पुणेकरांच्या पाण्याची गरज भागवण्याइतका बरसून गेला. कालचं शिळं पाणी प्यावं लागणार म्हणून अनेकांचं बीपी वाढलं होतंतर अनेकांना बोअरच्या पाण्यानं आपल्या चारचाक्या दुचाक्या धुवाव्या लागणार म्हणून टेन्शन आलं होतं. महाराष्ट्रात अनेक गावांत आठ-आठ तास वीज नसते. पण पुण्याला २४ तास वीज हवी म्हणून खास पॅटर्न तयार केला गेला. वीज मिळते आहे म्हणून कशीही वापरली जाते. चार-पाच मजले उतरायचेही इथल्या लोकांच्याजीवावर येतं. तेवढय़ा पायऱ्या आपण उतरलो तर जगबुडी होईल असं इथल्या लोकांना वाटतं. चार-पाच मजले उतरण्यासाठीही लिफ्ट तळमजल्यावरून वर बोलावतात ,अशी इथली ‘ स्पेशल ’ लोकं आहेत. म्हणूनच आपली टेरर निर्माण करायची असेल तर पुण्याइतकी योग्य जागा शोधून सापडणार नाही हे मी ओळखलं होतं. माझा अंदाज किती खरा ठरला हे दिसतं आहेच.

खरं तर मी पुण्यात यायला बिचकत होतो. तिथल्या प्रदूषणात आपला टिकाव लागणार नाही असं मला वाटत होतं. इथले लोक अजिबात चालत नाहीत. टिळक रोडवरचा माणूस फुले मंडईतही सॅंट्रो अल्टो किंवा हिरो होंडा घेऊन जातो. ‘ आपके पॉंव बहुत हसीन है इन्हें जमींपर मत रखिये ’, असं ‘ पाकिजा ’ तल्या राजकुमारप्रमाणं पुणेकरांना कोणीतरी सांगितलं आहे की काय कोणास ठाऊक इतक्या गाडय़ांच्या धुरामुळं आपल्या अंगावर रॅश उठेल अशी भीती माझ्या मनात होती. एकदाचा मी इथं आलो. पुणेकर कुणाला तरी घाबरतात हे बघून मला अत्यंत आनंद झाला. सगळ्या जगात ट्रॅफिक सिग्नलला किती मान आहे. एका लाल दिव्यासरशीशेकडो मोटारी एका क्षणात आहे त्या जागेवर थांबतात. पण तोच सिग्नल इथं बिच्चारा होऊन जातो. त्याच्याकडे कुणी बघतच नाही. घाबरायचं तर लांबच राहिलं. मलामात्र सगळे जाम घाबरलेत. सगळीकडे मास्कधारकांच्या फौजा दिसताहेत. घरोघरी माझीच चर्चा आहे. अनेकांनी बराक ओबामालाच इ मेल करून मला एक्सपोर्ट केल्याबद्दल धारेवर धरलंय असं कळतंय. माझ्यापासून कसं वाचता येईल याचा विचार चालू आहे. त्यामुळं मला इथला मुक्काम लवकरच हलवावा लागणार असं दिसतय .

आग

फेब्रुवारी 24, 2009

कालची गोष्ट.  दुपारी आजी येणार हे ऎकल्यावर सकाळपासुन वाट बघुन कंटाळून गेलेल्या सईला “बाहेरची गंमत दाखवतो” म्हणुन कडेवर घेतलं आणि खिडकी उघडली तर अचानक अंधारुन आलं. “नभ मेघांनी आक्रमिले” देखील झाले न्हवते. “मग ही काय गडबड?” म्हणेस्तवर शेजारच्या इमारतीमधुन धुराचे लोट बाहेर पडताना दिसले. “बापरे आग!” म्हणेस्तोवर अग्निशामकदलाच्या गाड्यांचा आवाज घुमु लागला. 

आमची सोसायटी म्हणजे तसं अजस्त्र प्रकरण आहे. मी राहतो ११ व्या मजल्यावर. इमारती ला मजले १४, प्रत्येक मजल्यावर जवळ जवळ ६० एक घरे. आणि अशाच ७ इमारती एकाच संकुलात. त्यात परत घरात सगळी जपानी पद्धतीची बांधणी. खाली फ़्लोरिंग लाकडी, सरकते दरवाजे, भिंतीतली कपाटे (काय पुणेरी शब्द आहे) सगळं लाकडी, त्यात परत गॅसची पाइपलाइन सगळीकडे फ़िरलेली. शिवाय हिवळ्यामुळे बहुतेक सगळ्यांकडे हीटर साठी केरोसीन चा साठा. त्यामुळे इथल्या इमारतीतुन चुकुन जरी अलार्म वाजला तर भॅयभॅय करत ५ गाड्या येतात. आज तर चक्क धुराचे लोट आणि बरोबरीला आगिच्या ज्वाळा बाहेरुन पण दिसत होत्या. ६ व्या मिनिटाला पहिली गाडी इमारतीसमोर उभी, हा हा म्हणता म्हणता आणखी १४ गाड्या आजुबाजुला सज्ज. सई हेरिकोपुता- हेरिकोपुता- म्हणतेय तोवर अग्निशमन दलाचे helicopter बरोबर आमच्या संकुलाच्या वर तरंगत थांबलेलं. म्हणजे एकदम stand-by.  अग्निशमन दलाची क्रेन ७व्या मजल्यापर्यंत चढतेय तोवर TV वाल्यांची पण 4-5 Helicopters आकाशात भराभरा गोळा झालेली. ह्या पत्रकारांना कुठुन लगेच वास लागतो कोण जाणे. आहो खाली बघितलं तर मॆदानात उभ्या असलेल्या बघ्यांच्या मुलाखती पण चालु झालेल्या…

To be continuted.

झकास

नोव्हेंबर 20, 2008

थंडी ने चांगलाच जोर धरलाय. सकाळी ७ च्या आधी घराबाहेर पडायचे अगदी जीवावर येतय. पण निदान कालपासुन हवा एकदम मस्त आहे. आकाश अगदी नीरभ्र. त्यामुळे १७व्या मजल्यावर ~ऒफ़िस मधे पोचल्या पोचल्या आधी खिडकी कडे धाव घेतली. पर्वतराज फ़ुजी ने काय सुरेख दर्शन दिलेय महाराजा… निळ्याभोर क्षितिजावर बर्फ़ाच्च्छादीत फ़ुजी… व्वा! दिवसाची सुरुवात तर अगदी झकास झाली. (रोज कॅमेरा बरोबर ठेवायला पाहिजे हिवाळ्यात.)

आजी

नोव्हेंबर 19, 2008

आजीला, म्हणजे बाबांच्या आईला मी लहानपणापासुन ओळखतो. म्हणजे माझ्या लहानपणापसुन बरंका (उगाच गॆरसमज नको). कधी मोठ्या काकांच्या घरी, कधी मधल्या काकांकडे, कधी आत्याकडे गोव्याला, तर कधी आमच्याकडे, असा आजीचा वर्षभर प्रवास चालु असतो. या वयात तीने इतकी दगदग करु नये असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. पण ती कधी कुठेच एका जागी फ़ार रमत नाही. आणि दर थोड्या दिवसांनी नातवंडानां अनं आता पंतवंडाना परत भेटावं अस तीला वाटु लागतं आणि तीचा मुक्काम हालतो.  तर अशी ही आमची आजी, बहुदा तुम्हा सगळ्यांच्या आजीशी साम्य असलेली.

आज अचानक आजीची आठवण होण्याचे कारण म्हणजे हा फ़ॉर्म, वॉर्ड ऑफ़िस ने पाठवलेला. आई-बाबा-आजी वगेरे सगळी माहिती भरायची होती. आईची माहिती भरायला काही प्रोब्लेम नाही आला. गंमत सुरु झाली बाबांपासुन. त्यांच्या आहेत दोन दोन जन्म तारखा, एक खरा (बहुतेक) जन्मदिवस अनं एक शाळेच्या दाखल्यावरचा, मास्तरांनी भरलेला. असे का? तर म्हणे, त्यावेळी खेडेगावात शाळेत घालताना जन्मतारीख वगेरे सांगत बसायला पालकांना कुठला वेळ! मग मास्तरच तारीख भरुन मोकळे होत असत. त्यामुळे बाबांच्या वर्गातील बहुतेक सर्व मुलांची जन्मतारीख १ मार्च किंवा २ मार्च. 😉 तो पण घोळ उरकला, आता आजीची पाळी. अरे बापरे, आजीचा जन्मदिन कुणाला ठाउकेय! Happy B’day वगेरेच फ़ॅड तीच्या पंतवंडांपासुन चालु झालेले. लावला लगेच फ़ोन आईला. नशिबाने आईच्या लक्षात होती. त्यामुळे पट्कन तारीख लिहुन घेतली आणि थेट वॉर्ड ~ऒफ़िस गाठलं. पण फ़ॉर्म भरता भरता एका कॉलम ने घोळ केला…… नाव – आजीचे नाव कोणाला माहितीये          😦 लहानपणापासुन मी आजीला आजी म्हणुनच ओळखतो. आणि आजीच्या नावाचा कधी कुठे उल्लेख यायचा प्रसंगही नाही. आता आली का पंचाइत. खुप आठवायचा प्रयत्न केला. शेवटी माझ्या काकांनी सांगितलेला एक विनोद आठवला… आजीला म्हणे एकदा तीच्या मामाचे पत्र आले.. वरती लिहिले होते – “आंबुस गोड आशिर्वाद” 🙂 म्हणजे Sweet-n-Sour Blessings नाही बरं! आंबु म्हणजे – अंबा – आजीचे नाव…… हुर्रे हुर्रे – आजी चे नाव समजले….. हुश्श्य!!!

या सगळ्या भानगडीत आपल्याला आपल्या आजीचे नाव आणि जन्मतारीख माहित नसावी याचे मला फ़ार वाइट वाटलं. तुमच्यापॆकी किती जणांना तुमच्या आजीचे नाव आणि जन्मतारीख लगेच आठवते???

मी परत आलो

नोव्हेंबर 10, 2008

फ़ार दिवसांनी स्वतःच्या ब्लॉगला भेट दिली.  हल्ली मी कधी न्हवे इतका बिझी आहे. आर्थात ब्लॉग लिहीण्या इतका वेळ खरतर नक्कीच होता.  पण डोक्यातल्या विचारांचा चिवडा शब्दरुपात यायला वेळ लागत होता. पण आज सका्ळी एक चांगला ब्लॉग वाचण्यात आला. छोट्या छो्ट्या टिपा – जणुकाही बोलता बोलता लिहुन काढले. हे छान, उगाच निबंध लिहित बसायची गरज नाही. आता मी पण असचं करतो. 🙂

शुभ दिपावली

ऑक्टोबर 29, 2008

सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेछ्छा!

पुण्यात आत्ता काय धमाल असेल. लक्ष्मी रोड ग्राहकांनी भरभरुन वाहत असेल. मुहुर्ताच्या खरेदी साठी तर सोन्याच्या दुकानात पाउल ठेवायला जागा नाहि म्हणे. मित्राच्या आईबाबांनी पण सोनं म्हणे चक्क बुकिंग करुन घेतलं. मुहुर्ताला हातात आलंच नाही.

काय म्हणताय? आमच्या इकडे कशी आहे दिवाळी? टोक्यो मधे काय दिवाळी अनं काय दसरा. सगळे दिवस सारखेच हो!

पण अगदीच असं काही नाही बरं का. आणखी माहिती पुढच्या पोस्ट मधे.

अभिनंदन – अभिनवचे!!! — पण

ऑगस्ट 13, 2008

हिंदुस्थान चे पहिले वहिले वैयक्तिक सुर्वणपदक जिंकल्याबद्दल अभिनव बिंद्रा चे मनःपुर्वक अभिनंदन!! अभिनव ची कामगिरी खरोखर भन्नाट आहे. खास करुन हा विचार केल्यास की हिंदुस्थानला या वैयक्तिक सुर्वणपदासाठी १०८ वर्ष वाट पहावी लागली. होय, हिंदुस्थान सन १९०० पासुन ऑलिंपिक मधे भाग घेत आहे. एकुण २२ वेळा सहभागी झालेल्या ऑलिंपिक मधील हिंदुस्थान च्या पदकांची संख्या आहे १८. (९ सुर्वण ४ रौप्य ५ कांस्य).

हा विरोधाभास का? – उत्तर खरं तर अगदी सोपे आहे. प्रचंड लोकसंख्येच्या या देशात गुणी खेळाडूंची मुळिच कमतरता नाही. कमतरता आहे ती साधनांची, आणि सराव करण्याच्या जागेची. कित्त्येक गुणी खेळाडू आजही सुविधांच्या अभावी बहरु शकत नाहीत.

एका बातमी नुसार आपल्या देशाच्या Sport budget पैकी ४०% पेक्षा अधिक पैसा Sports ministry च्या कर्मचारी आणि अधिकारी यांच्या पगारात जातो. राजकारणी आणि अधिकारी या व्यतिरिक्त किती पैसा खातात याबद्दल काहि बोलायलाच नको.

परवा सुर्वणपदक जिंकलेल्या अभिनवची आर्थिक परिस्थिती चांगली मजबुत आहे. पण तरीही त्याला अनिवासी भारतीय श्री मित्तल यांची आर्थिक मदत घ्यावी लागली. कारण आज कुठलाही खेळ ऑलिंपिक पातळीवर खेळायचे म्हणजे प्रचंड पैसा लागतो. मग, इतर सामान्य परिस्थितील खेळाडूंची अवस्था तर काय असावी?

ही परिस्थिती सुधारण्यासाठी काहिच करता येणार नाही का?

 

अपघात – असा आणि तसा

ऑगस्ट 7, 2008

नुकत्याच दोन बातम्या वाचनात आल्या. म्हटलं तर सारख्या, म्हटलं तर वेगळ्या.

बातमी क्र. १ (टोकियो, जपान) – Tokyo Big Site ह्या बहुपयोगी प्रदर्शन केन्द्रामधे पहिल्या मजल्यापासुन चौथा मजला जोडणारा एक सरकता जिना (escalator) अचानक थांबला, आणि हळुच थोडा खाली सरकला. त्यामुळे त्यावेळी जिन्यावर असलेल्या शंभराहुन अधीक लोकांपैकी अनेक जण धड्पडले. ह्या गडबडीत १० जणांना किरकोळ मुकामार तर १ व्यक्ती गंभीर जखमी झाली.

बातमी क्र. २ (हिमाचल प्रदेश, हिंदुस्थान) – नवरात्रीच्या उत्सवासाठी देवीच्या दर्शनास निघालेल्या यात्रेकरुंमधे, मुसळधार पावसमुळे दरड कोसळल्याची अफ़वा पसरुन, त्यामुळे झालेल्या धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरीमधे १४० हुन अधिक लोक ठार झाले.

तसे पहिले तर दोन्ही बातम्यात साम्यं आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी निमुळत्या ठिकाणी गडबड-गोंधळ उडाल्याने अपघात घडला आहे. आता दोन्हीं घटनांमधला फ़रक बघु या.

१. घटनेनंतर त्वरीत (म्हण्जे ७ मिनिटांच्या आत) घटनास्थळी १३/१४ रुग्णवाहिका, अग्निशमन विभागाच्या गाड्या हजर होत्या. थोडा देखील त्रास झालेल्या व्यक्तींना त्वरीत उपचार देण्यात आले. अन गंभीर परिस्थीतील व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

२. घटना घडुन गेल्यानंतरही कित्त्येक जणांना वैद्यकिय मदत मिळाली नाही. इतकेच नाहि, तर मृत म्हणुन घोषित झालेला मंगे राम इस्पितळात पोस्ट्मॉट्रेम च्या थोडा आधी शुद्धीवर आला आणि पाणी मागु लागला. याचा अर्थ, अपघात स्थळी पडलेल्या अनेक जणांची प्रमाणेच मंगे-रामची जिवंत आहे की नाही याची प्राथमिक खातरजमा न करताच शव म्हणुन रवानगी झाली होती.

१. अपघात घडल्याक्षणी तो जिना वापरासाठी बंद करण्यात आला. अपघाताची कारणमिमांसा आणि परत कुठेही असा अपघात न घडण्यासाठी घ्यायची काळजी याबद्दल जिना तयार करणारी कंपनी आणि अशा कंपन्यानंची संघटना यांना सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले.

२. घटनेनंतर जखमी आणि मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांना माहिती देण्यासाठी कोणीही उपलब्ध न्हवते. कारणमिमांसा आणि भविष्यातिल खबरदारी बद्दल तर कोणीच काही बोलत नाहि. (आले देवाचिया मना, तेथे काही चालेना!!)

एकीकडे जपान, जिथे माणसाच्या जीवाला, सुरक्षिततेला सर्वात जास्तं महत्व दिले जाते, आणि एकीकडे हिंदुस्थान, जिथे माणसाला काहिच किंमत नाही.

…….

Comment मधे आपले मत अवश्य नोंदवा.

माझ्याविषयी थोडेसे

जून 10, 2008

नमस्कार मंडळी,

इंटरनेट च्या महाजालातील (खरंतर मायाजाल?) माझ्या या रोजनिशीला भेट दिल्याबद्दल धन्यवाद.

मी शितल सेवेकरी. मुळचा पुण्याचा. म्हणजे तसा जन्म माझा सोलापुर जिल्ह्यातल्या बार्शी चा आहे. पण इयत्ता ५वी पासुन मुळा-मुठेचे पाणी पिउन वाढलो (“अरे किती वाढलायस!?” असं माझी मामी नेहमी म्हणते – असो) त्यामुळे पुणेरीपणा चांगलाच अंगवळणी पडलाय.

फ़र्गसन महाविद्यालयातुन भुगर्भशास्त्राची पदवी पदरी पाडुन (कशीबशी) झाल्यावर, गम्मत म्हणुन रानडे इन्स्टिट्युट मधे जपानी भाषा शिकलो. आज त्या गमतीच्या जोरावरच रोजिरोटी चालु आहे. नाहितर मला कसली टोक्यो ला यायची संधी मिळतेय. तसा मुलीचा हात मागयला लग्नाआधी एकदा आलो होतो. पण लग्नानंतर लगेच नोकरी बदलली आणि जपान मधे रहायची संधी पण मिळाली.

काय म्हणालात? “कसं आहे टोक्य़ो?” आहो एकदम झकास. सोयी सवलती तर इतक्या आहेत की माझ्या सारख्या अस्सल पुणेरी माणसाला पण नाव ठेवायला जागा नाहि कुठे. म्हणुन मग “सोयी जरा जास्तच आहेत – ह्याची काही गरज न्हवती – हे असे असले की यंत्रांच्या जगात माणुस हरवला आहे.” वगेरे वगेरे अधुन मधुन पुट्पुट्ले कि झाले, पुणेरी पणावर डाग नको, नाहि का? 🙂

अरे अरे – बरीच सरमिसळ झालेली दिसतेय. आहो विचारांची गर्दी झाली कि झालीच तयार – “बेडेकर मिसळ-पाव” – अस्सल पुणेरी..