अपघात – असा आणि तसा

By shimajiro

नुकत्याच दोन बातम्या वाचनात आल्या. म्हटलं तर सारख्या, म्हटलं तर वेगळ्या.

बातमी क्र. १ (टोकियो, जपान) – Tokyo Big Site ह्या बहुपयोगी प्रदर्शन केन्द्रामधे पहिल्या मजल्यापासुन चौथा मजला जोडणारा एक सरकता जिना (escalator) अचानक थांबला, आणि हळुच थोडा खाली सरकला. त्यामुळे त्यावेळी जिन्यावर असलेल्या शंभराहुन अधीक लोकांपैकी अनेक जण धड्पडले. ह्या गडबडीत १० जणांना किरकोळ मुकामार तर १ व्यक्ती गंभीर जखमी झाली.

बातमी क्र. २ (हिमाचल प्रदेश, हिंदुस्थान) – नवरात्रीच्या उत्सवासाठी देवीच्या दर्शनास निघालेल्या यात्रेकरुंमधे, मुसळधार पावसमुळे दरड कोसळल्याची अफ़वा पसरुन, त्यामुळे झालेल्या धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरीमधे १४० हुन अधिक लोक ठार झाले.

तसे पहिले तर दोन्ही बातम्यात साम्यं आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी निमुळत्या ठिकाणी गडबड-गोंधळ उडाल्याने अपघात घडला आहे. आता दोन्हीं घटनांमधला फ़रक बघु या.

१. घटनेनंतर त्वरीत (म्हण्जे ७ मिनिटांच्या आत) घटनास्थळी १३/१४ रुग्णवाहिका, अग्निशमन विभागाच्या गाड्या हजर होत्या. थोडा देखील त्रास झालेल्या व्यक्तींना त्वरीत उपचार देण्यात आले. अन गंभीर परिस्थीतील व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

२. घटना घडुन गेल्यानंतरही कित्त्येक जणांना वैद्यकिय मदत मिळाली नाही. इतकेच नाहि, तर मृत म्हणुन घोषित झालेला मंगे राम इस्पितळात पोस्ट्मॉट्रेम च्या थोडा आधी शुद्धीवर आला आणि पाणी मागु लागला. याचा अर्थ, अपघात स्थळी पडलेल्या अनेक जणांची प्रमाणेच मंगे-रामची जिवंत आहे की नाही याची प्राथमिक खातरजमा न करताच शव म्हणुन रवानगी झाली होती.

१. अपघात घडल्याक्षणी तो जिना वापरासाठी बंद करण्यात आला. अपघाताची कारणमिमांसा आणि परत कुठेही असा अपघात न घडण्यासाठी घ्यायची काळजी याबद्दल जिना तयार करणारी कंपनी आणि अशा कंपन्यानंची संघटना यांना सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले.

२. घटनेनंतर जखमी आणि मरण पावलेल्यांच्या नातेवाईकांना माहिती देण्यासाठी कोणीही उपलब्ध न्हवते. कारणमिमांसा आणि भविष्यातिल खबरदारी बद्दल तर कोणीच काही बोलत नाहि. (आले देवाचिया मना, तेथे काही चालेना!!)

एकीकडे जपान, जिथे माणसाच्या जीवाला, सुरक्षिततेला सर्वात जास्तं महत्व दिले जाते, आणि एकीकडे हिंदुस्थान, जिथे माणसाला काहिच किंमत नाही.

…….

Comment मधे आपले मत अवश्य नोंदवा.

Tags: , , , , ,

उत्तर नोंदवा